Friday, July 4, 2014

Vitthalachya payi veet jhali bhagyawant

विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताच होती दंग आज सर्व संत 
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

युगे अठ्ठावीस उभा विठू विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी
दर्शनास येथे जमती गरीब श्रीमंत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

पाहुनिया पुंडलिकाची सेवा ती अलोट
फेकताच वीट घडली परब्रह्म भेट
अनाथांचा नाथ हरी असे दयावंत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

कुठली ती होती माती कोण तो कुंभार
घडविता उभा राही पहा विश्वंभर
तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

पाहुनिया विटेवरती विठू भगवंत
दत्ता म्हणे मन माझे होई येथे शांत
गुरुकृपे साधीयला मी आज हा सुपंथ
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

पहाताच होती दंग आज सर्व संत 
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

कवी - दत्ता पाटील
गायक - प्रल्हाद शिंदे
संगीत - ??

Datta digambar daivat majhe

दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे
दत्त दिगंबर दैवत माझे

अनुसूयेचे सत्त्व आगळे, तिन्ही देवही झाली बाळे
त्रईमूर्ती अवतार मनोहर, दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे
दत्त दिगंबर दैवत माझे 


तीन शिरे कर सहा शोभती, हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरी पायी खडावा भस्म विलेपित कांती साजे
दत्त दिगंबर दैवत माझे 

पाहुनी पेमळ सुंदर मूर्ती, आनंदाचे आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती, हळूहळू सरते मीपण माझे
दत्त दिगंबर दैवत माझे

हृदयी माझ्या नित्य विराजे
दत्त दिगंबर दैवत माझे

गीतकार - सुधांशु
संगीत / गायक - आर. एन. पराडकर
(नोट: खाली दिलेल्या लिंक मधील गायक मूळ गायक आर.एन.पराडकर नाही)

Kuthe shodhisi Rameshwar kuthe shodhisi Kashi

कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी

झाड फुलांनी आले बहरून तू न पाहिले डोळे उघडून
वर्षाकाळी पाउसधारा तुला न दिसला त्यात इशारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी

रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेवून नांगर हाती पिकाविलेस मातीतून मोती
हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासून जाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी

देव बोलतो बाळ मुखातून देव डोलतो उंच पिकातून
कधी होवुनी देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी
अवतीभवती असून दिसेना शोधीतोस आकाशी 
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी

कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी 
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी

गीतकार -मंगेश पाडगावकर
गायक - सुधीर फडके
संगीत - यशवंत देव

Wednesday, July 2, 2014

He Hindu nrusinha prabho Shivaji raja

हे हिंदूशक्ती संभूत दीप्तितम तेजा
हे हिंदू तपस्यापुत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री सौभाग्यभूतीच्या साजा
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

करी हिंदूराष्ट्र हे तुते, वंदना
करी अंतःकरणज तुज, अभिनंदना
तव चरणी भक्तीच्या चर्ची चंदना
गुढाशा पुरवी त्या न कथु शकतो ज्या

हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

ही शुद्धी हृदाची रामदास शीर डुलवी
जी बुद्धी पाच शाह्यास शत्रूच्या झुलवी
जी युक्ती कुटनीतीत खलासी बुडवी
जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी
ती शुद्धी हेतूची कर्मी राहु दे
ती बुद्धी भाबड्या जीव लाभू दे
ती शक्ती श्रोणीतामाजी वाहु दे 

दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा 
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

कवी - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर 
गायिका -लता मंगेशकर / कोरस
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर

Savale sundar rup manohar

सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे
सावळे सुंदर रूप मनोहर

आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड
तुझे नाम गोड पांडुरंगा
सावळे सुंदर रूप मनोहर

जन्मो जन्मी ऐसे मागितले तुज
आम्हासी सहज द्यावे आता
सावळे सुंदर रूप मनोहर

तुका म्हणे तुज असे दयाल
धुंडिता सकळ नाही आम्हा
सावळे सुंदर रूप मनोहर

राहो निरंतर हृदयी माझे
सावळे सुंदर रूप मनोहर

अभंग - संत तुकाराम महाराज
गायक - मा. पं. भीमसेन जोशी 

Tuesday, July 1, 2014

Abir gulal udhalit rang natha ghari nache majha sakha Pandurang

अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग

उंबरठ्यासी  कैसे शिऊ आम्ही जातिहीन
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन
पायरीशी होवू दंग गावूनी अभंग
अबीर गुलाल उधळीत रंग 

वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग

आषाढी कार्तिकी भक्तजन येती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती
चोख म्हणे नाम घेता भक्त होती दंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग

अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग

अभंग - संत चोखामेळा
गायक - पं. जितेंद्र अभिषेकी

Bolava Vitthal pahava Vitthal

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

येणे सोसे मन झाले हावभरी 
परत माघारी येत नाही
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव

बंधनापासुनी उकलली गाठी
देता आली मिठी सावकाश
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव


तुका म्हणे देह भरिला विठ्ठल
काम क्रोधे केले घर रिते
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
अभंग - संत तुकाराम
गायक - पं. जितेंद्र अभिषेकी
गायिका (स्वतंत्र वेगळी चाल) - किशोरी अमोणकर